जगदंबा अभियांत्रिकी च्या रासेयो पथकातर्फे रक्तदान शिबिर संपन्न
स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे दि. २१/३/२०२४ रोजी रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले. यावेळी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथुन डॉ. रसिका पेंदोर, समाजसेवा अधीक्षक आशिष खडसे, मोहन तळवेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भांबेरे, विभाग प्रमुख डॉ. विजय नेवे, प्रा. पराग ठाकरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण वानखडे, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. सुमित राऊत, रासेयो स्वयंसेवक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रविण वानखडे यांनी केले, आशिष खडसे यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थितांना रक्तदानाचे महत्व पटवुन दिले. डॉ. विजय भांबेरे यांनी उपस्थित सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या व रक्तदान हेच श्रेष्टदान याची महती पटवुन दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. चिन्मयी तांबुले हिने केले. सदर रक्तदान शिबिराकरिता महाविद्यालयामधील ७६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला. रक्तदान शिबिर यशस्विरित्या पार पाडण्याकरीता रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी प्रणव पार्लावार व सर्व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले, त्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ. शितल वातीले यांनी कौतुक केले.








